राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १९८९ मध्ये देशभरात सर्वत्र सेवा निधीचं संकलन करण्यात आले होते. या निधीद्वारे महाराष्ट्रात ६७५ सेवा प्रकल्प पुरस्कृत करण्यात आले आहेत. सेवा कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना या निधीतून डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार देण्यात येतो. या वषीर्चा पुरस्कार देवबांध येथील सह्यादी आदिवासी बहुविध सेवा संघाचे संस्थापक नवसू महादू वळवी यांना दिला जाणार आहे.
वनवासी सेवा आणि वनौषधी संवर्धन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणमधील प्रसिद्ध आकिर्टेक्ट दिलीप दळवी असतील. चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. रामदास मराड यावेळी प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहसंघचालक अनिरुद्ध देशपांडे यांचे मोलाचे विचार ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालून आल्याची माहिती डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधीचे अध्यक्ष बापूराव मोकाशी यांनी दिली. |
|