आदिवासी भूषण डॉ. गोविंद गारे
ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक जॉ. गोविंद गारे यांचे २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे निधन झाले. त्याच्या स्मृतिदिन
ानिमित्त त्याच्या महान कार्याचा घेतलेला हा आढावा...
आदिवासींच्या कल्याणासाठी जीवाचे रान करतानाच त्यांच्या नावावर सवलती लाटणाऱ्या जातींचा पंचनामा करण्याचे काम प्रामुख्याने डॉ. गोविंद गारे यांनी केले. त्यांचा धाक एवढा असे की , आदिवासींचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करतानाच संबंधितांना विचार करावा लागे. आदिवासींचे कल्याण हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते आणि त्यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत होते.
पुण्याजवळील निमगिरी (जुन्नर) या आदिवासी पट्ट्यातील गावात महादेव कोळी या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला. आदिवासीपण जगल्याने त्याचे चटके काय असतात हे त्यांना पुस्तकातून समजून घ्यावे लागले नाही. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी समाजशास्त्र विषयाची पदवी मिळवली. डॉक्टरेट मिळवल्यानंतर सरकारच्या आदिवासी कल्याण विभागात नोकरी पत्करली.
१९६७ ते ८९ असा प्रदीर्घ काळ ते पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक होते. संस्थेत त्यांनी आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची निमिर्ती केली. त्यांच्याच काळात सर्वाधिक संशोधन अहवाल तयार झाले. नोकरीत असताना 1982 मध्ये ते आयएएस झाले.
हाडाचा कार्यकर्ता असलेल्या या माणसाला नोकरशहा होणे मात्र कधीच जमले नाही. ते नेहमीच आदिवासींच्या संशोधनासाठी देशभरातील आदिमांच्या पाड्यांवर रमलेले असत. त्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे , तर देशातील आदिवासी त्यांचा प्रदेश , जीवन , संस्कृती या विषयात ते तज्ज्ञ समजले जात. सुमारे ४५ वर्षे आदिवासींच्या संशोधनात रमलेल्या गारेंनी आदिवासींच्या प्रश्नावर ४५ ग्रंथांचे लेखन केले आहे.
त्यांच्या अनेक ग्रंथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. अलिकडेच ' आदिवासींच्या नावावर सवलती लुबाडणाऱ्या जातींचा पंचनामा ' हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला होता. ' शिवनेरी भूषण ', ' आदिवासी भूषण ', ' आदिवासी सेवक ' आणि ' वीर बिरसा मुण्डा राष्ट्रीय पुरस्कार ' त्यांच्या नावावर जमा आहेत. महाराष्ट्र आदिवासी दर्शन , महासंघ वार्ता , आदिवासी संशोधन पत्रिका , या नियतकालिकांचे ते अनेक वर्षे संपादक होते.
आदिवासींबाबत सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले , तसेच विविध संघटनांमध्येही ते सक्रिय होते. आदिवासी विकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. थोडक्यात काय , तर जेथे आदिवासींचे कल्याण साधले जाईल अशा प्रत्येक कामात डॉ. गोविंद गारे आघाडीवर असत.