आदिवासी कल्याणाचा फडकता ध्वज...
यवतमाळ जिल्ह्यातील डोळके दाम्पत्याचे अनोखे कार्य
आम्ही आमचे आरोग्य हातात ठेवू. आमचे हक्क, अधिकारांविषयी जागृत होऊ, अशी शपथ प्रत्येकजण घेत असेल... 'भारत माता की जय'चा नारा बुलंद होत असेल... माहितीच्या अधिकाराविषयी चर्चा सुरू असेल... स्वातंत्र्याचा अर्थ समजावून घेत यवतमाळपासून काही किमी अंतरावर असलेल्या आदिवासी पट्ट्यात शुक्रवारी ध्वजारोहण सोहळा साजरा होईल. त्यावेळी २२ हजारांहून अधिक आदिवासींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी, समस्यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी धडपडणाऱ्या डोळके दाम्पत्याच्या १२ वर्षाच्या मेहनतीचेही चीज होत असेल.
बाहेरच्या जगाशी क्वचितच संबंध आलेले कोलम, गोंड, परधान या आदिवासी जमाती यवतमाळ जिल्ह्यात केळापूर, मारेगाव पट्ट्यात मोठ्या संख्येने आहेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन अजय व योगिनी या डोळके दाम्पत्याने १२ वर्षापूवीर् या भागातील आदिवासींचे जीवनमान सुधारण्याच्या कामास सुरुवात केली. 'सृजन' हे त्यांच्या मिशनचे सार्थ नाव. त्यांच्या त्या प्रयत्नांना आज मोठे यश आले आहे. 'अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासींचा स्वातंत्र्य, देश अशा शब्दांशीही कधी संबंध आला नव्हता. त्यांच्यात स्वत:च्या हक्कांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही शुक्रवारच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधले आहे. या सगळ्यांना एकत्र आणून ध्वजारोहण केल्यानंतर स्वशासन, ग्रामसभेचे हक्क, कायद्याचे संरक्षण, आरोग्याचे हक्क याची माहिती त्यांना देण्यात येईल', असे अजय यांनी सांगितले. ४० वर्षीय अजय हे जंगले व त्याबाबतचे कायदे या विषयातील तज्ज्ञ आहेत; तर त्यांची ३९ वषीर्य पत्नी योगिनी जिऑलॉजिस्ट व फूड न्यूट्रीशन तज्ज्ञ आहे. या परिसरातील अनेक सुशिक्षित तरुणही 'सृजन'च्या या अनोख्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले आहेत.
मिशन 'सृजन'
फारशी सरकारी मदत न घेता आदिवासी पाड्यांतील मृत्यूदर कमी करणे. आदिवासींना उपजिविकेचे पर्याय निर्माण करण्याचे प्रशिक्षण देणे. तरुणांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणे. आरोग्याचा हक्क आदिवासींना मिळवून देणे.