Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Save Land! Save Tribals ! कुणी जमीन देतेय का जमीन ? " आवाज तलासरीच्या डोंगारीतून

तलासरी येथे घडलेल्या घटनेने सर्व आदिवासींचे चित्त तर खवळलेच, पण या अघोरी कृत्य करणाऱ्यांना 'माणूस' म्हणावे का हा हि एक प्रश्नच उभा राहिला आहे. आज आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावण्यात येत आहे. पिढ्या न पिढ्या ज्या जमिनी त्यांनी कसल्या त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या जमिनी फक्त एक भू भागाचा तुकडा नाही, जो कुणीही हिसकावून घ्यावा, हि जमीन म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेले संस्कार आहेत, जे पिढ्या न पिढ्या त्यांनी जपले आहेत. ते अशे सातबाऱ्यावर कसे मोजता येणार? 

कनसरी मातेवर बुलडोझर फिरवून फक्त आदिवासींच्या भाताचेच नुकसान नाही केलेय तर त्यांच्या भावनांचा खेळ करून, त्यांच्या संस्कृतीवर पण घाला घातलाय. अन आदिवासी संस्कृतीवर घाला म्हणजे आदिवासी समाज अस्मितेवर केलेला आघात आहे !

धरतीला पाय लावण्या पूर्वी "अथ नाचू का कोठ नाचू, धरतरी माझी माय रं, पाय कसा लावू तील ?" असे म्हणणारा तसेच जमिनीतून पिकवलेल्या अन्नाला जीव पेक्षा जास्त जपणाऱ्या आदिवासींच्या भातावर जेव्हा बुलडोजर फिरवला जातो तेव्हा तो त्याच्या हृदयावर फिरवला जातो. कारण तुमच्या साठी फक्त हे धान्य असेल, ज्याची किंमत पैशात मोजली जाते. पण आदिवासींसाठी ती कनसरी माता आहे, आणि मातेची किंमत पैशात करणाऱ्या सारखा दुसरा पांखंडी कुणी नाही. कनसरी मातेची पूजा केल्या शिवाय तिचा घास हि न घेणारा आदिवासी जेव्हा तिच्यावर बुलडोजर फिरताना पाहतो, तेव्हा त्याच्या हृदयावर तलवार नाही फिरली तर तो आदिवासी काय?

सकाळी सकाळी शेतात दिमाखाने नाचणारी कनसरी माता चिखलात तुडवली जात असेल तर हवालदिल आदिवासी च्या डोळ्यात अश्रूंचा अंगार येतो आणि त्याच्या पायाची आग मस्तकात जाते. पण मोठ्या शक्तींकडून ती आग बुल्डोजारच्या चाकाखाली शमविली जाते. किती दिवस आदिवासी असा हवालदिल होत राहणार? कधी प्रकल्पाच्या नावावर... कधी शहरीकरनाच्या निमित्ताने, तर कधी धरणे आणि पुनर्वसनाच्या निमित्ताने (सुसरी धरण, दापचरी प्रकल्प, सूर्या प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग ८ चौपदरीकरण, गेल वायू पायीप लयीन, ओएनगीसी डहाणू मध्ये २००० एकर, मुंबईतले अंधेरी, गोरेगाव, बोरीवली .... आसामचे बोडो, बस्तर चे दंतेवाडा, ओडीशाचे वेदांता, ...) आता फक्त देश सोडून जाणे तेव्हडे बाकी राहिलेय (ते पण पालघर मध्ये गेल्या वर्षी काही पाश्चिमात्य शक्तींनी चालू केले होते, म्हणे इझ्रायीलला नेणार होते) 

प्रत्येक दिवस आदिवासी हा अन्याय सहन करतोय, का म्हणून सहन करायचे आदिवासींनी हे अन्याय? आदिवासींच्या प्रश्नांचे भांडवल करून त्यांना मदत (?) करणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. आज "अमका" एक साहेब आला त्याने कपडे दिले तर "तमक्याने" ब्लंकेट अन खावू दिले, या अन अशा अनेक बातम्या ऐकिवात येतात. पण आदिवासींना दयेची भिक नकोय ते मुळातच निसर्ग संपन्न भागाचे मालक आहेत. खायला नाही म्हणून खाद्य पदार्थ आणि पांघरायला ब्लंकेट देण्या पेक्षा, निसर्गाचे वैभव ज्यांच्या अंगणात नांदत होते, त्या आदिवासीवर हि लाचारी का आली याचा शोध घेतला आणि उपाय योजना केल्या तर नक्कीच आदिवासी पूर्वी सारखे संपन्न आणि स्वावलंबी आयुष्य जगू शकेल, जखमेवर तात्पुरते मलम लावण्या पेक्षा 'जखम का झाली' याचा शोध घेतल्यास खऱ्या अर्थाने विकासास हातभार लागेल. विकासाच्या नावावर त्यांना लाचार बनवन्या पेक्षा त्यांना सक्षम बनवले तर ते जास्त हितावह ठरेल. 

विकासाच्या नावाखाली धर्मांतर सारखे पर्याय सुचवले जाताहेत, अन धर्मांतरवर काही बोलल्यास सुशिक्षितांचे (कि अर्धशिक्षित ?) प्रश्न तयारच असतात,"कि म्हणे संविधानाने प्रत्येकालाच कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे, मग तुम्ही विरोध का करता?" धर्मांतराला आमचा विरोध नाही. ज्याने त्याने आपली आदिवासी संस्कृती जपत आपल्या मर्जीने धर्माचे अवलंबन करावे. पण असे स्पष्टीकरण देणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे, कि संविधानात धर्मांतराचा अधिकार पाळत असताना आदिवासींचा जमिनीचा हक्क बाधित ठेवण्याचा अधिकार का पळत नाही? कारण संविधान म्हणते कि, 'आपला अधिकार वापरत असताना दुसऱ्याच्या अधिकारास तुम्ही बाधा पोचत असेल, तर ती राज्यघटनेची पायमल्ली आहे. मग आज किती तरी एकर आदिवासींची जमीन त्यांना फसवून , त्यांच्या अज्ञानाच फायदा घेऊन प्रसंगी लुबाडून बिगरआदिवासींच्या ताब्यात आहेत, तेंव्हा मग इथे कुठे जातो कायदा न संविधान? कि असला काही अधिकार संविधानात आहे हे अशा सुशिक्षितांना (कि अर्धशिक्षित?) माहीतच नाही...? आज किती तरी आदिवासींना स्वतःच्या जमिनीवर गडी म्हणून राबवून घेतले जात आहेत. बस्तर मध्ये तर लाखोंचे स्थलांतर झाले, लाखोंना नक्षलवादाच्या मार्गाला लावले आणि हजारोंचे बळी घेतले गेले, तेव्हा कुठे गेले संविधान? मग इथे का कुणी संविधानात दिलेल्या अधिकाराची भाषा बोलत? ‘देव देतो अन कर्म नेते म्हणतात ना, तसे संविधानाने दिले अन समाज कंटा कानी नेले' असे झालेय !

गगनचुंबी इमारती मध्ये राहण्याराना न चकचकीत भांडया मध्ये चमचमीत पदार्थ हासडून खाणाऱ्याना काय कळणार कनसरीचे मूल्य? एक वेळचे जेवण मिळत नाही म्हणून कळकट बशीतून दुपारचे जेवण घोटभर चहावर भागावनाऱ्याला कळते कनसरीची किंमत! एकीकडे प्रतिष्टेच्या नावावर आपल्या मुलांवर लाखो खर्च केले जातात तर दुसरी कडे, एक रुपयाच्या नाण्यासाठी रडून रडून कोमेजलेल्या मुलाला समजावताना अन पोर ऐकत नाही म्हणून काळजाला गाठ मारून पोराला बदड बदड बदडवाऱ्या हवालदिल मातेला पहिले कि, तेंव्हा खरेच चीड येते तुमच्या श्रीमंतीची! 

श्रीमंत होणे हा गुन्हा नाही पण इतरांवर अन्याय करून श्रीमंत होणे हा खरोखरच मोठा मानवी अपराध आहे. कारण इथे माणूसकिचाच अंत होतो! अशा वेळी काही दीड शहाणे असा हि प्रश्न करतात कि "तुम्हाला कुणी अडवलय...? तुम्ही हि कमवा पैसे" अन आदिवासींच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्न करतात, तेव्हा अशांचा राग न येता कीवच येते, अरे ज्या काळात आयुर्वेदाचा, धनुर्विद्येचा, धातुशात्र, तसेच इत्तर शस्त्रांचा गंध हि नव्हता त्या काळात आदिवासी या विद्या मध्ये पारंगत होता, या अन अशा किती तरी गोष्टी त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवल्या होत्या. पणआज आदिवासींच्या आत्मविश्वासावरच घाला घातला जातोय, एका धक्यातून सावरत नाही तोच दुसरा! 'आज नवीन कायदा, उद्या जमिनीवर धरण बांधणार, उद्या नवीन प्रकल्प अन पुनर्वसन होणार,'हे अन असे अनेक आघात ! मग मनोधेर्य खचलेला आदिवासी फक्त जगण्या साठी हि लढावे. धडपडावे लागते . संपत्ती मिळवणे तर राहिलेच, पण त्यांची जंगल अन जमीन संपत्ती पण समाज कंटाकांच्या घशात जाते . 

काय विसंगती आहे हि नाही , आपले सरकार कसाब सारख्या नाराधामावर करोडो रुपये खर्च करू शकते ,परदेशीयांना आश्रय देवू शकते. पण आदिवासींचे प्रश्न सोडवणे तर दूरच....पण ते जग जाहीर करायलाही यांची हिम्मत होत नाही. कारण काय तर परकीयांना थारा दिल्यास मतांमध्ये भर पडेल, पण आदिवासींना अभय दिल्यास ते निर्भय होवून परीस्थितीचा सामना करतील, अन मग काय... त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी बिल्डरच्या घश्यात घालणे तर दूरच पण त्यांच्या विकास साठी मिळणारे (?) प्याकेजचा पण हिशोब द्यावा लागेल. मग यात त्यांचे नुकसानच नाय का? ! 

खरच नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील डॉ. श्री राम लागुंचे सवांद आठवतात " कुणी घर देते का घर" एके काळच्या नटसम्राटाच्या तोंडचे हे केविलवाणे संवाद! उत्तम नाट्य रचना अन अप्रतिम अभिनयाची सांगड हे या नाटकाचे वैशिष्ट्य!! आज अशीच काहीशी आदिवासींची अवस्था झालीय. लाख मोलाच्या जमिनीचा मालक असूनही आज कुणी" जमीन देते का..... जमीन....?" असे म्हणायची वेळ आली आहे त्याच्यावर! (तलासरी काही वर्षा पूर्वी हा तालुका ९५ % आदिवासी लोकसंख्या असलेला होता)

स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासींच्या भावनाशी खेळणे हि माणुसकी आहे ?..... कनसरी मातेवर बुलडोजर फिरवणारी माणसेच होती कि पशु ?.... या प्रकाराला जर माणुसकीच्या नजरेतून पहिले तर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, हे अन अशा मानवी रूपातल्या पशूंना क्षमा नाही, मग तो कोणत्याही जाती धर्माचा अगदी आदिवासी असला तरी त्याला माफ करणे अशक्य!

आदिवासी समाजाने संघटीत होवून अशा परिस्तितीशी सामना कार्याची तयारी ठेवावी, आपली संस्कृती परंपरा आणि अस्मिता याचे जतन करावे. आदिवासी तरुणांना समाजीक जाणीव आणि जबाबदारीची जाणीव करून देणे महत्वाचे आहे. आपल्या समाजात जागरुकता करणे हे आपले कर्तव्य समजून आपण जागरुकता करण्या साठी प्रयत्न केले पाहिजेत. झोपले असाल तर जागे व्हा नाही तर तो वेळ फार लांब नाही जेव्हा बुलडोजरच्या चाका खाली असेल आदिवासी आणि त्याची अस्मिता

- आदिकन्या | संचिता सातवी (28 Aug 2012)

Read Live updates at : https://www.facebook.com/media/set/?set=a.515662081792867.138081.100000472403313&type=1
Author @ Google

Find us on Facebook