Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

आरक्षणाची चोरी - संचिता सातवी

या आरक्षणाची पण आपली एक वेगळीच दैना आहे. कारण आरक्षणाची सुद्धा चोरी होवू लागलीय.
दागिन्यांची चोरी, पैशांची चोरी ऐकली होती. पण..आरक्षणाची चोरी...? होय.आरक्षणाची चोरी.!  ऐकून धक्का बसला ना ..? 
"बस झाले आता! आदिवासींना आरक्षण देणे  बंद करा ... !" असे म्हणणारा एक गट आहे तर 'आदिवासींना ५० वर्षापूर्वीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे" असे म्हणणारा कायदा बंद करा" 
असे म्हणणारा दुसरा गट आहे . आणि या गटांच्या लढायित एक तिसराच ज्याचा या कोणत्याही लढायीशी संबंध नाही असा गट खोटी कागदपत्रे सादर करून स्वताला आदिवासी म्हणवून घेवून, आदिवासींच्या नोकऱ्या आणि सवलती लाटून मजा मारतोय .... आणि ज्या तळागाळातल्या, गरजू आदिवासीला हे आरक्षण लागू होतेय, जे या आरक्षणाचे खरे दावेदार आहेत त्यांना मात्र असले काही आरक्षण संविधानाने आपल्याला दिलेय याची पुसटशी कल्पनाही नाही......या गरजूंच्या तोंडाचा घास पळविणे म्हणजेच आरक्षणाची चोरी करणे. आणि अशी चोरी करणारे आणि त्यांना खोटी कागदपत्रे मिळवून देण्यास मदत करणारे अधिकारी हे दोन्हीही सारखेच गुन्हेगार आहेत. खरे तर आदिवासींच्या विकासाचा दर्जा सुधारावा .त्यांची शैक्षणिक ,आर्थिक दृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी हे आरक्षण आदिवासींना संविधानाने दिले .पण आजतागायत आदिवासींची परिस्थिती होती तशीच आहे .जे काही सुशिक्षित आदिवासी या आरक्षणाचा फायदा घेवून पुढे आले त्यांनी समाजाकडेच पाठ फिरवली. आणि याचाच फायदा बोगस आदिवासींनी घेवून आदिवासींच्या तोंडाचा घास हिसकावून खायला सुरवात केली व आज हे प्रमाण इतके वाढलेय कि आज जवळ जवळ १ लाखापेक्षा जास्त नोकऱ्या ह्या बोगस आदिवासींनी लाटल्यात.इतकेच काय तर आदिवासी चे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पैशांचा प्रसंगी ताकदीचा व प्रलोभानाचा वापर करून हि कागद पत्रे मिळवली जाताहेत . ज्या परिस्थितीने पछाडलेल्या ,गरजू आदिवासींना हे आरक्षण लागू होते, त्यावर आज केवळ सधनच नाही तर श्रीमंत व अतिश्रीमंत पांढरपेश्यांनी आज बोगस कागदपत्रे सादर करून आदिवासींच्या नोकऱ्या लाटत आहेत. .केवळ नोकऱ्या व सवलती मिळविण्यासाठी स्वताला आदिवासी म्हणत आहेत .याला चोरी नाही तर काय म्हणायची ...? एरवी ज्या आदिवासी समाजाला अंधश्रद्धाळू ,गरीब, पिछाडलेले ,व्यसनाधीन म्हणवणारे हे लोक नोकऱ्या व सवलतींसाठी मात्र स्वताला आदिवासी(कि बोगस ) म्हणवून घेवू लागलेत .एरवी गरीब आदिवासींकडून गड्यांची कामे करवून घेणारे हे आज स्वताला या समाजाचा हिस्सा म्हणवू लागलेत.काय म्हणावे या वृत्तीला. केवळ फायद्यासाठी स्वताची जात सोडून स्वताला दुसऱ्या जातीचा म्हणवणारा मनुष्य हा किती कृतघ्न व मतलब साधू आहे हे कळते. असा मनुष्य स्वताच्या समाजाशी इमान राखत नाही, तो आपला काय उद्धार करणार....? मग यांना कुणी अधिकार दिला आदिवासी म्हणवून घेवून आमच्या नोकऱ्या पळविण्याचा ...? यापेक्षा प्राणी बरे जे इतर ठिकाणी खायला जास्त मिळत असले तरी मालकाला सोडून जात नाहीत, मालकाशी इमान राखतात. यांना माहित तरी आहे का कि आदिवासी म्हणजे काय, त्यांची संस्कृती ,त्यांची भाषा काय आहे ते...? अरे हो... पण हे कुठे आदिवासींवर पी एच.डी करताहेत, यांना तर फक्त आपल्या नोकऱ्या हव्यात. मग आदिवासी जगो वा मरो ..आपल्याला त्याच्याशी काय करायचेय, नाही का...?' यांना तर हेही ठावूक नाही कि खरा आदिवासी कधीच बेईमानी करीत नाही मग तुम्ही कोण स्वतःला आदिवासी म्हणविणारे ..? आदिवासींच्या मानगुटीवर बसलेले हे नवीन भूत म्हणजे बोगस आदिवासी ! आता हा काय प्रकार आहे ..? बोगस माल, बोगस कागदपत्रे ऐकले होते पण हा बोगस आदिवासी काय प्रकार आहे बुवा ...? मग खरे आदिवासी कोण...? आम्ही जे ५० वर्षापूर्वीपासून आदिवासी असल्याचा पुरावा बाळगणारे कि ते ज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घूस चारून आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवलाय ते...? कोण खरे आदिवासी आणि कोण बोगस हे कसे ओळखावे...? कारण हे बोगस लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी स्वतःला आदिवासी म्हणवून घेताहेत आणि आपण खरे आदिवासी म्हणून नोकऱ्या मिळवलयात पण समाजाकडे तर दोघांनी पण पाठ फिरवली न ...? मग आपण खरे आदिवासी कसे...?
आपण तर खरे आदिवासी ना...! मग आपल्या नोकऱ्या लाटणाऱ्या या बोगस चोरांविरुद्ध आपले रक्त का खवळत नाही ...? का "आपल्याला आरक्षण मिळाले बस झाले ,आता तुम्ही काहीही करा" असा जर विचार करत असाल तर आपल्या मुलाबाळांचा ,लहान भावंडांचा विचार करा.
परंतु असेही नाही कि या बोगस लोकांना घरी बसून चार शिव्या दिल्या कि झाली आपली जबाबदारी पूर्ण!.नाही.कारण आपण ज्या अर्थी आदिवासी म्हणून सवलती घेतल्या त्या अर्थी या समाजाचे ऋण आपण फेडायलाच हवे अन्यथा या आरक्षणाचा लाभ घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आज कितीतरी सुशिक्षित आदिवासींनी या सवलतींचा लाभ घेतलाय व स्वतःची प्रगती करून घेतलीय . परंतु जेव्हा प्रश्न येतो समाजाच्या प्रगतीचा तेव्हा मात्र समाजाकडे पाठ फिरवलीय
आणि विशेष म्हणजे या गोष्टीचे ना आपल्या तरुणांना गांभीर्य वाटतेय ना आपल्या आमदार, खासदारांना! सर्वच्या सर्व मुग गिळून गप्प बसलेत. जर हे असेच चालू राहिले ना तर आज आरक्षणाची चोरी होतेय, पण उद्या आपले अस्तित्वच चोरीला जायला वेळ नाय लागणार.
घरात चोरी होत असताना चोराला "चोरी करू नकोस' म्हणून विनंती करायची कि त्याच्या मुसक्या बांधायच्या , हे आता तुम्हीच ठरवा!

काहींनी तर स्वतःला आदिवासी म्हणवून घ्यायला पण लाजा वाटू लागल्यात मग बोगस आदिवासी आणि आपण (जे खरे आदिवासी असण्याचा दावा करतात) यांच्यात फरक काय..? काय विरोधाभास आहे आणि हा..कि एकीकडे ज्यांचा काही संबंध नाही आदिवासींशी ते स्वतःला आदिवासी म्हणवून घेताहेत आणि एकीकडे जे आदिवासी आहेत ते स्वतःला आदिवासी म्हणवून घेण्यास नकार देताहेत.पण आरक्षण, सवलती मात्र दोघांनाही हव्यात .खरेच आज प्रश्न पडतोय कि" खरे आदिवासी कोण आणि बोगस कोण ..?' "जे खोटे दाखले मिळवून नोकऱ्या लाटणारे कि, जे खरे असून आरक्षण घेवून गप्प बसणारे,,,!' कारण हे दोघेही समाजाला घातकच नाही का...? नाही म्हणायला समाजाचे ऋण प्रामाणिकपणे फेडणारे आहेत पण ते केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच .आणि त्यांना हातभार लावणारेही तुरळकच !

Find us on Facebook