Pages

मला बदललेल्या देशाबरोबर चालणारा आदिवासी बघायचा आहे...

या देशात स्वातंत्र्य आहे, हे एक नेहमीचंच नियमित वाक्य....शुभ्र कपड्यातील तथाकथित आपणच निवडून दिलेल्या पांढरपेशा लोकांनी ग्रासलेला हा देश....ख-या स्वातंत्र्यासाठी अजूनही विव्हळत आहे....लहानपणी वाटायचं जग बदलण अगदी सोप्प आहे....१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला शाळेत मिरवणूक निघायची...मागे भली मोठी ठिगळांची खाकी इजार एका हातानं सावरत आम्ही त्यात उत्साहाने सामील व्हायचो.... उरामध्ये प्रचंड स्वाभिमान घेऊन अगदी बेंबीच्या देठापासून "भारत माता....कि जय"चे नारे द्यायचो. लहानपणी ब-याच खोड्या देखील करायचो पण मनामध्ये नेहमी एक भीती असायची की चूक केली तर शिक्षा होईल. शिक्षकांची, पालकांची, वडिलधा-यांची एक भीती असायची; म्हणून वाटायच ख-या देशात देखील असंच सरकारला आणि न्यायाला भीत असतील लोक....पण जसा जसा या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये कधी आश्रमशाळांमध्ये...तर कधी वसतिगृहांमध्ये मोठा होत गेलो तसं तसा खरा भारत दिसायला लागला. त्याबरोबर या वृक्षराजीमध्ये आपले अस्तित्त्व अबाधित ठेवणारा माझा माय-बाप आदिवासी समाजही दिसू लागला.

आदिवासी घाबरतात पण न्यायाला नाही तर जे लोक आपल्या खिशामध्ये न्याय घेऊन फिरतात त्यांना. दिवसा ढवळ्या या देशाला लुटणा-या लुटारूंना, आणि या भारत मातेच्या अब्रूचे धिंडवडे उडवणा-या सैतानांना. जंगलतोड करून माळरान उजाड करणा-या हैवानांना. जागोजागी धरणे बांधून आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात आणणा-या पांढरपेशांना. आमच्या आया-बहिणींवर अत्याचार करणा-या नराधमांना. अजून इथे आम्ही आता घाबरतोय आमच्यातीलच शिकलेल्या परंतु सामाजिक बांधिलकीच्या संवेदना न जाणणा-यांना....

आज देशात कुठेही एखादे प्रमाणपत्र काढायचं झाल तर जिथे २ दिवस लागायचे तिथे ७ दिवस लागतात कारण काय तर कामाचा बोजा, आणि ५० रुपये पुढे केले तर २ दिवसाचे काम २ तासामध्ये होते. कारण काय तर पैसा. पुढे कळायला लागला हा पैसा ह्या लोकांच्या घरात जात नाही तर दारूच्या दुकानात जातो, यांच्या मुलांच्या डोनेशन मध्ये जातो, ५०-५० रुपयांचा भ्रष्टाचार वेगळाच, पण १००-१०० हजार करोड रुपयांचा घोटाळा ही होतो.... हे लक्षात यायला लागल. आदिवासींच्या योजनातर अनेकदा कागदावरच राहतात आणि आमची लेकरं कोवळ्या पानगळीसारखी कुपोषणाने मरतात...मरत आहेत...कि मारत आहेत या योजना. आजवर विकासाच्या नावावर करोडो रुपयांची अगदी राख रांगोळी झाली, पण विकासाचा लवलेशही अजूनपर्यंत आमच्या आदिवासींच्या नशिबाला आला नाही......भारतीयांचा कदाचित थोडा फार चेहरा मोहरा बदलला असेलही....पण या डोंगरद-यात आपले वास्तव्य करणारा हा माझा आदिवासी समाज....याच्या स्वातंत्र्याचे काय....आजही तो एकवेळच्या भाकरीसाठी व्याकुळ आहे.....विव्हळत आहे.

निवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सणासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आदिवासींना तर आश्वासने देणं खूप सोपं असतं....कारण देणारा आमच्यातीलच कोणी एक आहे अशी आमची गोड समजूत असते. आम्हीही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नाही गेली ६७ वर्षे आम्ही तेच ते बघतो आहोत. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; नाही नाही त्या वाढल्या आहेत. देशाच्या प्रगतीबरोबर आमच्या समस्यांची प्रगती होत आहे. किती हा विरोधाभास..... किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःलाच लढावे लागते, स्वताच्या जमिनींसाठी...हक्काच्या नोक-यांसाठी....आमच्या वनांसाठी....पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो आहोत. आता तर काही ठिकाणी आमच्या समाज बांधवांच्या दोन कानांवर दोन बंदुका आहेत. एक आहे पोलिसांची आणि एक नक्षल्यांची. कोणालाही साथ द्या...शेवटी बेवारस मरण नशिबाला.....मग कुठे आहे स्वातंत्र्य...कोणाकडे आहे. कोण विकतं...पण त्येवढं पैसं कुठं हाय मजजवळ..... मग मी मनानं..संस्कृतीनं...कलेनं श्रीमंत असणारा आदिवासी...गरीबच ना? नाही मिळत अजूनही उत्तर..!! जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त झालेली गर्दी पाहून डोळे पाणावले होते यावर्षी....खरच हा आदिवासी समाज काही तथाकथित लोकांसाठी किती मोठं भांडवल आहे.

कुठे तरी एक छान वाक्य ऐकलय, आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, फ़क़्त एवढ्या पुरतेच भारतीय मर्यादित राहिले आहेत. परंतु या भारतीयांमधील आदिवासींना आपल्या बायकोला पुरेसे अंगभर कपडे घ्यायचीसुद्धा ऐपत नाही. आमच्या पोरांना आश्रमशाळेत कपडे मिळतात म्हणून ती तरी इज्जत झाकली जाते नशीब. कदाचित दोनवेळचे जेवण आणि अंगभर कपडे एवढ्यासाठीच आमची पोरं आश्रमशाळांमध्ये जात आहेत... अन्यथा आज त्याठीकानीही काय चालते..कोणाची पोळी भाजली जाते तेवढी समज आलीय. पण करणार काय....शेवटी आदिवासी....!!!

रोज अन्याय होतो म्हणून प्रत्येक जन रडत असतो, झोपडीत राहणा-या सामान्य माणसापासून ते मोठ मोठ्या उद्योगपतीन पर्यंत सर्वच्या सर्व फ़क़्त आणि फ़क़्त रडत असतात, पण कधी ही कुणी पेटून उठत नाही, कधी कुणाची हाक ऐकू आलीच तर आम्ही साधा प्रतिसादसुद्धा देत नाहीत. स्वतंत्र भारतात आम्ही गुलाम आहोत अज्ञानाचे, भ्रष्टाचाराचे, बेरोजगारीचे, निरक्षरतेचे, धर्मांधतेचे, अंधश्रध्येचे आणि जाती पातीने ग्रासलेल्या घाणेरड्या मानसिकतेचे. आदिवासींनाही हि मानसिकता लागू पडते. कारण आज आमच्यातही काही शिकून मोठ्या पदावर पोहचलेत. परंतु आदिवासींवर होणारा अन्याय त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही....गेंड्याची कातडी डोळ्यांवर ओढून घेतलीय..त्यांना या सामाजिक संवेदना जाणवतच नाहीत....काही आहेत अपवाद...पण अपवादाने ते तोकडे आहेत आज.

सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की एका आवाजात "जय" चा उदघोष करणारे आम्ही.... कधी 'जय आदिवासी', 'एक तीर एक कमान...सर्व आदिवासी एक समान' असा जयजयकार करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न आणि त्याबरोबर आदिवासी हितसंबंधांचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरुषांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत? बिरसा मुंडा, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे, ख्वाजा नाईक आदी क्रांतीकारकांचे विचार आम्ही अंगीकारणार? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील देखील... पण जो बदल सहज घडेल असे कधी वाटायचे त्या बदलाची सुरुवात कधी होणार? कधी पेटून उठणार आदिवासी आपल्या स्वायत्त मागण्यांसाठी?

निराशेने ग्रासलेल्या या आदिवासी समाजाला ख-या स्वातंत्र्याचा सूर्य दाखवायचा असेल तर एक सशक्त आणि ठणठणीत विचारच हे काम साध्य करू शकतो. नशिबाने येणारी नवी पिढी विचार करणारी आहे, जी पिढी स्वतःच्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपलं आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा समाजही घडण्याची देखील अपेक्षा आहे. आपल्या सारखे विचार करणारे खूप आहेत, बदलाची आणि ख-या स्वातंत्र्याची प्रचंड भूक लागलेले खूप जन आहेत, म्हणूनच एक नवी आशा निर्माण झालीय...- 'आम्हाला बदलेला देश नाही तर प्रगत देशाबरोबर बदलेला आदिवासी बघायचा आहे'. जे स्वप्न आम्ही लहानपणी बघायचो, त्या निर्मळ स्वप्नासाठी आपल्या प्रत्येकाला आपला सहभाग द्यावाच लागेल. कुठलाही देश किंवा समाज एका रात्री मध्ये उभा राहत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागते, आमच्या नशिबाने आमच्या महापुरुषांनी ही मेहनत घेतली आहे. गरज आहे फ़क़्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची, हे नवे पाऊल उचलण्याची प्रतिज्ञा आजच्या या स्वातंत्र्य दिनी घेऊन, हातामध्ये हात घेऊन सबंध देश घेऊन पुढे जाऊया. जमेल तेथे- जमेल त्या प्रकारे- जमेल ते प्रयत्न आदिवासी समाजनिर्मितीसाठी करूयात. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे न बघता प्रयत्न करण्यावर भर देवूयात. रोजच तो प्रयत्न होत असेल तर ठीक आणि नसेल होत तर आठवण येईल तेव्हा तो करत राहुयात. पक्ष-व्यक्तीनिष्टांच्या टीकांना दुर्लक्षित करून जमेल त्या प्रमाणात समाजकार्यात सहभाग घेऊयात. संघटना झालीच तर खूप छान, पण संघटना नाही म्हणून थांबायला नको, सुरवात करूयात, इतरलोक काही करत असतील तर त्यांना मदत करूयात. कमीत कमी अन्यायाची जाणीव अज्ञानात खितपत पडलेल्या आदिवासी समाज बांधवांना तर कुणीही करून देऊ शकतो. नाहीच लढता आलं तर अन्याय होतोय याची तरी जाणीव करून देवूयात. कदाचित यातूनच पुढे क्रांतीचे पुढचे पाऊल पडेल.

देशात छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल यासारख्या थोरांच्या विचारांनी पेरलेली आपली मस्तके नापीक होवूच शकत नाहीत... कारण त्यांना वेळोवेळी फुले, टिळक, आंबेडकर यांनी विचारांचे खत घातलय. तेव्हा स्वाभिमानाने, निधड्या छातीने पसरलेल्या अंधाकाराला दूर करण्यासाठी हवे ते प्रयत्न करा.

महादेवकोळी युवा आज प्रत्येक तळमळ असलेल्या आदिवासी युवकांना आवाहन करत आहे. हे पाऊल तुम्हीच उचलण्याची गरज आहे. अथक प्रयत्नाने आणि हजारोंचे रक्त सांडून आपला देश स्वतंत्र झाला; त्यात आदिवासी क्रांतिकारकांचाहि समावेश होता... त्या सर्वांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, जमेल तिथे जमेल त्या प्रकारे एक खरा स्वतंत्र भारत आणि स्वाभिमानी आदिवासी समाज निर्माण करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचला.
तुम्हाला साथ आहे आमची, आणि आमच्या सारख्या हजारोंची.

-राजू ठोकळ
मी आदिवासी.....माझा मायबाप आदिवासी