Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य ! - संचिता सातवी

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !
 धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार!
डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण  आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा  हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते.
अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत .
येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण  शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत .

आवाज उठवणारे विद्यार्थी टार्गेट!
 आज या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेय कि ,शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या वसतिगृहात  आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी केवळ असुरक्षितच नाहीत तर प्रचंड मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत . मग काय आधीच अनेक समस्यांनी पिडीत असलेला  आपल्या कुटुंबापासून लांब राहत असलेला  विद्यार्थी इतक्या प्रचंड दहशतीखाली असेल तर काय भविष्य घडवणार तो स्वतःचे  समाजाचे …? हा विषय खूपच गंभीर बनत चाललेला आहे ,कारण आश्रमशाळा वा वसतिगृहात चाललेल्या  गैरप्रकारामुळे विद्यार्थांना मुळातच मुलभुत सुविधांसाठी झगडावे लागत आहे, हे कमी होते कि काय म्हणून आता विद्यार्थांना मारहाण  बलात्कारासारखे सारखे प्रकार घडताहेत ,याचा दुष्परिणाम विद्यार्थांच्या अभ्यासावर होवून त्यांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे , विद्यार्थ्यांचे भविष्यच धोक्यात आले आहे . आणि याविरुध्द आवाज उठवणाऱ्या विद्यार्थांनाच निशाणा बनवले जात आहे .  यामुळे विद्यार्थांना  मानसिक  शारीरिक त्रास होत असतो . आणि मुख्य म्हणजे याचा ना  आपल्या तरुण पिढीला चीड येतेय, ना आदिवासी समाजातून किंबहुना वस्तीगृहातूनच मोठे होवून बाहेर पडलेल्या उच्चशिक्षित आदिवासींना , स्वतःला आदिवासींचे कैवारी समजणाऱ्या आदिवासी नेत्यांना ।! सर्व आपापले खिसे भरण्यात मग्न आहेत .

उदासीन उच्चशिक्षित आदिवासी तरुण पिढी!
आणि एरवी कोंबड्यालाही लाजवेल इतके  नियमित facebookवर  वा twitter वर गुड मोर्निंग बोलणारे माझे आदिवासी बंधू_ भगिनी आता कुठे गायब झाले,या प्रकरणाबद्दल ची post   facebook वर टाकली गेली ,जेणेकरून आजच्या तरुण पिढीचा धगधगता राग comment च्या रूपाने दिसेल पण  मी विसरलेच कि कोंबड्यांना केवळ गुड मोर्निंग बोलता  येते. अरे मित्रांनो हे काय चालवलेय  तुम्ही…? जिथे google  facebook माध्यम  बनवून  आज तुमच्यातीलच काही तरुण समाज बदलाची भाषा करताहेत,आणि  आपण  कुठे  केवळ गुड मोर्निग  नट नट्यांच्या फोटोला like करत बसताहेत,अर्थात  हेही आहे कि मौजमस्तीसाठी गरजेचे ! पण समाजाबद्दल आपण एव्हडे उदासीन कसे, कि ते वाचायलाही आपल्याजवळ वेळ नसतो . केवळ  ते  जण आपली मते comment  like करून मांडत असतात ,मग  बाकीचे कुठे  गेले  ….?शेवटी social networking site वर दिल्या जाणार्या comment आणि like म्हणजेच आपल्या विचारांचा  दृष्टिकोनाचा आरसा असतो हे विसरून चालणार नाही . आपण तलवार  घेवून युध्द करायला नाय जावू शकत तर निदान जखमींना मलम तर लावू शकतो  …?केवळ या online माध्यमातून आपले विचार तर मांडू शकतो ,कि आपला सामाजाबद्दलचा  स्वाभिमानच हरवला आहे ….?
केवळ आगरचीच घटना नाही तर अलीकडेच घडलेली  धुंदलवाडी  येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीवर  बलात्कार प्रकरणाची घटना असो, या  अशा अनेक गुन्ह्यांचे ठिकाण आदिवासी आश्रमशाळा  वसतिगृहे बनत चाललेली आहेत आणि  हे नीच कृत्य करण्यात त्या त्या आश्रमशाळेतील अधीक्षक  सुरक्षारक्षकाचे हात बरबटले आहेत . .

नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …?
आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे ऐकूनही आपल्या तरुणाईचे रक्त खवळत नाही .त्यांच्या मनात या असल्या नीच लोकांबद्दल चीड निर्माण होत नाही कारण आमचे रक्तच थंड पडलेय ।अगदि बर्फासारखे थंड ! कि असे तर नाही नाही  कि आपण स्वतःला आदिवासी समजणेच सोडून दिलेय !
एका आश्रम शाळेला भेट दिली , तेथील मुलींच्या सौचालाय /बाथरुमला दरवाजेच नाहीत ,सताड उघडी बाथरूम ! सदर अधीक्षकाला जाब विचारला असता  त्या "महान" व्यक्तीचे उत्तर आले,"आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी लहान आहेत (७ वी,ते ११वी)  म्हणून त्यांना कशाला दरवाजे हवेत …?"
धिक्कार असो अशा मानासिकतेचा  !. १०वी,११वी च्या विद्यार्थिनी लहान…? आणि लहान असल्या म्हणून का त्यांनी उघड्यावर शौचास  अंघोळीला जावे …? मित्रांनो हे सर्व आपल्याच समाजाच्या बाबतीत घडते 'वर्षानु वर्षे उघड्यावर हगणाऱ्या आदिवासींना कशाला हवेत दरवाजा बंद बाथरूम …?' अशी त्या मागची नीच भावना या लोकांच्या मनात असते .
आज या अशा अनेक घटना आदिवासी विद्यार्थांचे हक्काचे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत  वसतिगृहात घडत आहेत,आहेत ,परंतु त्याविरुद्ध कोणता आदिवासी नेता आवाज उठवताना  संसदेत हा विषय ठोसपणे मांडताना दिसत आहे …? कि केवळ दुसर्यांच्या हातातले बाहुले बनून राहणाऱ्या या नेत्यांना आपल्या सभेत तारपा  नाचवण्या पुरतेच आदिवासी आठवतात  …? एरवी बेगडी पाठींबा दाखवून आदिवासीच्या सेवेच्या आणाभाका घेणारे नेते अशावेळेस कापुराच्या वडीसारखे कुठे उडून जातात …?

आयात केलेले बिगर आदिवासी, कर्मचारी मोठे संकट !         
 विद्यार्थांचे पालकही या बाबतीत उदासीन दिसतात ,पालकांनी मिळून जर आवाज उठवला तर पुन्हा असली हिम्मत कुणी करायला शंभरदा विचार करेल .परन्तु गरिबीने ग्रासलेले  संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेले पालक आपल्या पाल्यांच्या या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत ,कुणी पालकांनी आवाज उठवलाच तर तो बड्या प्रवृत्तींकडून  दाबला जातोय .
           आणखी एका मुद्द्याकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटतेय कि ,आज बहुतेक  आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक म्हणा अधीक्षक किंवा सुरक्षारक्षक वा इतर कर्मचारी हे स्थानिक आदिवासी नसून देशावरून आलेले बिगर आदिवासी असतात ,या लोकांना  आदिवासी समाजाबद्दल आपुलकी असते ना अस्मिता (काही अपवाद वगळता)केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करायची म्हणून करत असतात .  जर स्थानिक आदिवासींची निवड या ठिकाणी झाली तर नक्कीच हे प्रकार बदलू शकतात . निदान तशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही
             काही "अभ्यासू"(…?) लोकांनी आम्हालाही प्रश्न विचारलेत कि ''तुम्ही काय करता या असल्या प्रश्नांवर… ? ,काहींनी तर निर्णयच दिला कि 'तुम्ही काहीच करताना दिसत नाहीत' .अशा अभ्यासू मंडळींना मी सांगू इच्छिते कि केवळ इतरांना "तुम्ही काय केले ""असे विचारण्यापेक्षा " आपण सोबत मिळून  करूया 'असे म्हणा ; मित्रांनो हा समाज आपला आहे, मग कुणी एक व्यक्ती किंवा संघटना एकटीने लढून चालत नाही.  त्यासाठी एकजूट होणे गरजेचे आहे . कारण एकटा  आवाज दाबला जातोय पण तोच आवाज जेव्हा पूर्ण समाजाकडून उठवला जाईल  , तेव्हा तो एल्गार असेल  .,
मित्रांनो हा लेख त्या तमाम आदिवासी तरुणांना जागे करण्यास आहे जे समाजात होणारे अन्याय बघूनही शांत आहेत .ज्यांची  बोटे केवळ नट नट्यांच्या फोटोला like करण्यात मग्न असतात . आपण या समाजाचे भविष्य आहोत. पण  इतके उदासीन भविष्य काय कुणाचा उद्धार करणार …?


उपाय 
             या घटनाच्या निमित्ताने आपण तरुण पिढी एकत्र येवून पुढील गोष्टी तर नक्कीच करू शकतो .
१) पालक ,आजी  माजी विद्यार्थी यांची एक समिती स्थापन करून एक दबाव गट बनविणे ,जेणेकरून असे प्रकार घडल्यास आपला दबाव गट प्रशासन  आपले नेते दोघांवरही दबाव आणून या असल्या प्रकरणाचा छडा लावण्यास  दोषींना योग्य ती शिक्षा देण्यास  आपण त्यांना भाग पाडू शकतो .
 ) याशिवाय सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा एक गट बनवून ते आपल्या पाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देवू शकतात ,शेवटी एकीचे बळच कामी येते .
 ) आश्रमशाळेतील  आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थांना आपल्यावर होणाऱ्या  अन्यायाविरुध्द बोलण्यास पुढे आणायला हवे ,याशाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अभय देणे गरजेचे आहे .
 ) पालक  विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून अन्याय झाला तर त्याबद्दल दाद कशी मागावी ,कुठे तक्रार करावी हे सर्व मुद्दे त्यांना पटवून देवून त्याची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे .
यासाठी सर्वांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे शेवटी आजचे विद्यार्थी हे उद्या समाजाचे भविष्य ठरतील .

लक्षात घ्या ,आता शांत बसले तर छत्तीसगड  झारखंड च्या आदिवासिंसारखी (लाखो आदिवासींची गावेच्या गावे पेटवून देणे ,त्यांना  त्यांच्या जमिनीवरून हुसकावणे ,आदिवासी स्त्रियांवर बलात्कार ,नक्षलवादी सांगून आदिवासींवर गोळीबार ,खून आणि प्रचंड प्रमाणात आदिवासींची पिळवणूक ) आपली गत व्ह्यायला वेळ नाही लागणार, किंबहुना ही  त्याच पर्वाची सुरवात मानायला हरकत नाही.

संचिता सातवी, आदिवासी युवा शक्ती




Online Photo : https://plus.google.com/photos/103801329114961339077/albums/5936457438279297025 


Find us on Facebook