Pages

धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत

Sign online petition : Click here

धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.
पहिला मुद्दा : ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग (Dhangad) असे झाले आहे.
प्रतिवाद : धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D) असे लिहिले जाते. हा एक मोठाच जावईशोध म्हणावा लागेल. हे खरे आहे की इंग्रजीत 'र' आणि 'ड' यांचा बदल होतो, परंतु हा बदल नेहमी 'ड' चा 'र' असा होतो तो कधीही 'र' चा 'ड' होत नाही. (उदाहरणार्थ 'साडी' हा शब्द 'सारी' (Sari) असा होतो, 'अनाडी' हा शब्द 'अनारी' (Anari) असा होतो, परंतु नारी हा शब्द कधीही नाडी असा होत नाही, वारी हा शब्द कधीही वाडी असा होत नाही. धारवाड हे Dharwar लिहिता येऊ शकते मात्र कारवार हे कधीही Karwad (कारवाड) असे लिहिले जाऊ शकत नाही. अशी अनेको उदाहरणे देता येतील) मग जर इंग्रजीचे स्पेलिंग चुकले असेलच तर धनगड (Dhangad) चे धनगर (Dhangar) होऊ शकते मात्र कधीही धनगर (Dhangar) चे धनगड/ धांगड (Dhangad) असे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धनगर बांधवांचा दावा की 'धनगर'चे स्पेलिंग Dhangad असे लिहिले गेले आहे हा तांत्रिकदृष्ट्या देखील सपशेल फोल ठरतो. आणि म्हणूनच आपल्या धनगर बांधवांचे असे "र-ड-णे" हे हास्यास्पदच ठरते.
'र' च्या उच्चारणात येणाऱ्या दुर्बलतेला 'रॉटासिजम' असे म्हणतात. हा अनेक भाषांत आहे. आयरिश आणि स्कॉटिश भाषेत 'र' आणि 'न' यांचा बदल होतो. स्पॅनिश भाषेत 'र' चा उच्चार 'ट' असा होतो. म्हणजे इंग्रजांऐवजी स्पेनने भारतावर राज्य केले असते तर धनगरांच्या डोक्यात ही कल्पनाही आली नसती.
दुसरा मुद्दा : धनगर म्हणतात की त्यांस छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये धनवार (dhanwar) या नावाने आरक्षण मिळाले असून तेथील धनवार व महाराष्ट्रातील धनगर हे एकच आहेत.
प्रतिवाद : पहिल्या मुद्द्यात दावा केलेली Dhangad (धांगड) आणि छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील Dhanwar (धनवार) या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आहेत. धनगरांचा नेमका दावा 'धांगड' वर आहे की 'धनवार'वर आहे हे त्यांचे त्यांनाच पुरेसे स्पष्ट नाही. धनवार आणि धनगर या जातींत संस्कृती, चालीरीती, धार्मिक परंपरा, देवदैवते, भाषा, पेहराव यापैकी काहीही समान नाही. मग ते एक कसे ठरतील? आता धनगर बांधवांचा असा तर दावा नाही ना की इंग्रजीत g चा सुद्धा w होतो, कारण त्याशिवाय Dhangar चे Dhanwar होऊ शकत नाही.
२०१३ साली धनवार या जातीशी नामसाधर्म्य साधणारी दोन जातीनामे छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींत सामील करण्यास हिरवा कंदील मिळाला. ती दोन नावे धनुवार/धनुहार अशी आहेत. दोन्ही शब्दांत 'न' या अक्षरास उकार आहे, त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुद्धा धनगर अनुसूचित जमातींत येऊ शकत नाहीत. कारण धनगर या शब्दात उकार नाहीच. त्यामुळे त्यांत नामसाधर्म्य देखील आढळत नाही.
बहुदा आपले धनगर बांधव अनुसूचित जमातीची कलम ३४२ नुसार केलेली व्याख्याच वाचायला विसरले असावेत. त्यात स्पष्ट लिहिले आहे की अनुसूचित जमाती केवळ त्यांनाच म्हणता येईल की ज्यांत १) आदिम वैशिष्ट्ये असतील, २) त्यांची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, ३) ते भौगोलिक दृष्ट्या पृथक असतील म्हणजेच त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश हा निश्चित आणि दुर्गम असेल, ४) ते इतर जमातींत मिसळण्यास कचरत असतील.
यापैकी मुद्धा २ म्हणजे वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही एक व्यापक व्याख्या आहे आणि भारतातील सर्वच जातींची आणि धर्मांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. (उदाहरणार्थ ब्राम्हण, जैन, पारसी, मुस्लिम, शीख या सगळ्यांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.) पण म्हणून याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा अनुसूचित जमाती ठरण्यास पात्र आहेत.
मग बाकीचे मुद्दे पहिले तर असे लक्षात येते की धनगर या जातीत कोणतीही आदिम वैशिष्ट्ये नाहीत. ते भौगोलिक दृष्ट्या अजिबात पृथक नाहीत. (पृथक भौगोलिक क्षेत्र हे अनुसूचित जमातींचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.) उलट त्यांची वस्तीस्थाने ही नेहमी बदलत राहतात, त्यामुळे त्यांना मिळालेले भटक्या जमाती हे आरक्षणच योग्य आहे. धनगर दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत, त्यांचे वास्तव्य हे कायम नागरी वस्तींत असते. ते इतर जमातींत व्यवहारासाठी मिसळण्यास कचरत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धनगर हे अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.

Rahul C Bhangare